गडचिरोली: शासकीय आश्रमशाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करुन त्यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना मुलचेरा तालुक्यात घडली. याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी सुभाष खुशाबराव लांडे (४१) व संदीप शिवाजी फड (३६) या शिक्षकांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित विद्यार्थिनी एका निवासी शासकीय आश्रमशाळेत शिक्षकत आहेत. २० सप्टेंबर २०२५ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दोन्ही शिक्षकांनी आपला विनयभंग केला. तसेच परीक्षेत पुस्तकातून बघून उत्तरे लिहिल्याचा आरोप करीत काठीने बेदम मारहाण केली. शिवाय टीसीवर लाल पेनाने सही करुन करिअर उद्ध्वस्त करु, अशी धमकीही त्यांनी दिली.
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सुभाष लांडे व संदीप फड या शिक्षकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(२), ११८(१) सह पोक्सो कायद्याच्या कलम १२, ४२, बाल न्याय अधिनियम ७५, अनुसूचित जाती, जमाती अत्याच्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.