गडचिरोली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एसबीआय फाऊंडेशन आणि पुणेस्थित जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्था 'वॉटर' (WOTR - Watershed Organisation Trust) यांनी भागीदारी करत गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यासाठी उपजीविका विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.
एसबीआय फाऊंडेशनच्या प्रमुख ‘लीप’ (Livelihood and Entrepreneurship Accelerator Programme) उपक्रमांतर्गत हा प्रकल्प वॉटर संस्थेमार्फत ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२८ या तीन वर्षांसाठी धानोरा उपविभागातील 19 गावात राबविण्यात येणार आहे. फाऊंडेशनने या उपक्रमासाठी ४ कोटी ९८ लाख ६५ हजार रुपये अनुदान दिले आहे.
धानोरा तालुक्यातील १९ ग्रामीण गावांमधील १,२९४ कुटुंबांची उपजीविका सुधारणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उत्पन्नाचे स्रोत केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विविधीकरण करून, या कुटुंबांचे वार्षिक घरगुती उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढवणे हे प्रकल्पाचे लक्ष्य आहे. हे महत्त्वाचे उद्दिष्ट साधण्यासाठी प्रकल्प जलसंपदा विकास, टिकाऊ शेती आणि पशुधन व्यवस्थापन या तीन मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
धानोरा तालुक्यातील बोदिरी, कामनगड, मोरचुल, कान्हेली, हलकानहर, मरकेगाव, मिचगाव (झाडा), पेकिनमुडझा, पायडी, सोमालपूर, बोतेहूर, झाडपापडा, रूपिनगट्टा, मसनडी, दुर्गापूर, पळसगाव, खारगी, धोरगट्टा आणि रेचे या गावांचा समावेश या प्रकल्पात असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी या गावातील महत्वाच्या व्यक्तींसोबत वैयक्तीक व सामूहिक चर्चादेखील झाली आहे.
सहभागी संस्थांचा अनुभव
या प्रकल्पातील भागीदार संस्था त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करतात. एसबीआय फाऊंडेशनचा ‘लीप’ उपक्रम देशभरातील वंचित समुदायांना दारिद्र्याच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी सूक्ष्म-उद्योजकता आणि एकात्मिक उपजीविका मॉडेल विकसित करण्यावर भर देतो. दुसरीकडे, वॉटर (WOTR) ही संस्था १९९३ मध्ये स्थापन झाली असून, ती प्रामुख्याने पाणलोट क्षेत्र विकास, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या क्षेत्रांतील तिच्या प्रदीर्घ अनुभवासाठी ओळखली जाते. एसबीआय फाऊंडेशनचे आर्थिक पाठबळ आणि वॉटर चे ग्रामीण उपजीविका व जलव्यवस्थापनाचे तज्ज्ञ ज्ञान एकत्र आल्याने, येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक व पर्यावरणीय परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.