गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याप्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व वसतिगृहाच्या अधीक्षकास निलंबित केले असून, सहा कर्मचाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखली आहे.
डी.जी.रापंजी असे निलंबित केलेल्या मुख्याध्यापकाचे, तर एम.एम.पाटील असे अधीक्षकाचे नाव आहे. तसेच महिला वसतिगृहाच्या अधीक्षका पी.एस.मडावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी जी.एस.बोम्मावार, एस.एम.पवार, एस.एस.नैताम, सी.बी.कुळसंगे, डी.एफ.कोकोडे यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
२८ जानेवारीच्या सकाळी लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत जवळपास ६० विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना दवाखान्यात भरती केले असता अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहायक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विस्तृत माहिती जाणून घेतली होती. शिवाय गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीही आश्रमशाळेला भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला दिलेल्या भेटीत भयावह वास्तव निदर्शनास आले.
स्वयंपाकगृहात अस्वच्छता होती, तर फळे, भाजीपाला व धान्य सडलेल्या स्थितीत आढळला. या अक्षम्य चुकीबद्दला मुख्याध्यापक व अधीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात मुख्याध्यापकाचे मुख्यालय एटापल्ली तालुक्यातील जांबिया, तर अधीक्षकाचे मुख्यालय हालेवारा येथे देण्यात आले आहे. रिक्त पदांचा प्रभार उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आर.एन.हारमे व लिपिक वैभव देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सडलेले अन्नधान्य पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केव्हा?
आश्रमशाळेला धान्य व भाजीपाला पुरविण्याचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार उच्च प्रतीचे अन्नधान्य पुरवीत नसून, सडलेले साहित्य पुरवीत असल्याचे आढळून आले. यातूनच ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.