गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील युवतीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी (दि.५) तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. अनिल संतू उसेंडी (वय २३, रा. दोबे, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर, छत्तीसगड सध्या रा. शिवणी) असे आरोपीचे नाव आहे.
गडचिराली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावातील २३ वर्षीय तरुणी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे. २ मार्चला संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ती गावाबाहेर काही कामानिमित्त गेली होती. परंतु एक तास होऊनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिकडे जाऊन बघितले असता गावाबाहेरील एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात बेशुध्दावस्थेत आढळली. तिला जबर मारहाण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. त्यामुळे तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. ग्रामस्थांनी तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेगवेगळे पथक तयार करुन तपास केला.
त्यानंतर तरूणीची फिर्याद व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी अनिल उसेंडी याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बुधवारी (दि.५) न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी दिली.