गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जंगलालगतच्या शेतात सरपण गोळा करीत असताना बिबट्याने हल्ला करुन महिलेला ठार केल्याची घटना आज सकाळी कुरखेडा तालुक्यातील ठुसी गावाजवळ घडली. सायत्राबाई अंताराम बोगा(५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली या तालुक्यांमध्ये वाघ आणि रानटी हत्तीचा धुमाकूळ वाढला आहे. या प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानीदेखील झाली आहे. अशातच आज ठुसी येथील सायत्राबाई बोगा ही महिला आपल्या शेतावर गेली होती. कामे आटोपल्यानंतर ती शेजारच्या जंगलात सरपण गोळा करीत होता. परंतु बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावातील काही नागरिकांनी शेताजवळच्या जंगलात जाऊन बघितले असता सायत्राबाई मृतावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. तिच्यावर वाघाने हल्ला केला की अन्य प्राण्याने याविषयी संभ्रम आहे. मात्र, परिसरातील जंगलात बिबट्यांचा वावर आहे आणि शरीरावरील जखमांच्या खुणांवरुन बिबट्यानेच हल्ला केला असण्याची शक्यता अधिक आहे, असे देलनवाडीचे वनपरिक्षेत्राधिकारी श्री.मेहर यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.