Elephant Usegaon crop damage  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Elephant | ३३ रानटी हत्तींचा पुन्हा उच्छाद; उसेगाव परिसरातील पिके उद्ध्वस्त

आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर रानटी हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली तालुक्याकडे वळविला आहे

पुढारी वृत्तसेवा

Elephant Usegaon crop damage

गडचिरोली : आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर ३३ च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली तालुक्याकडे वळविला आहे.  उसेगाव आणि राजगाटा परिसरातील पिके उद्ध्वस्त केल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.

तीन दिवसांपूर्वी रानटी हत्ती देसाईगंज-कुरखेडा मार्गावरुन रस्ता ओलांडताना दिसले होते. त्यानंतर त्यांनी आरमोरी तालुक्यात शिरकाव करुन वैरागड परिसरातील पिकाचे नुकसान केले. रविवारी रात्री रानटी हत्तींचा कळप उसेगाव व राजगाटा परिसरात आला. त्यातील हत्तींनी धान, मका, आंबा, पपई, ताड इत्यादी पिके आणि फळवृक्षांची नासधूस केली.

सुरुवातीला जनार्दन ठुनेकार यांच्या शेतातील उन्हाळी धानपिकाचे नुकसान केल्यानंतर हे हत्ती विमल तुमरेटी व अल्का कुमोटी याच्या शेतात गेले. तेथील धान, आंबा, पपई, केळी व ताडाचे त्यांनी मोठे नुकसान केले. त्यानंतर हत्तींनी कृष्णा राऊत यांच्या शेततळ्यात धुडगूस घातला. नंतर मिरचीचे पीक तुडवीत हत्ती बेलटेककडे निघून गेले. हत्तींनी उच्छाद मांडल्याने शेतकरी त्रस्त असून, नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करुन संबंधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव मधुकर रेवाडे यांनी केली आहे.

१४ शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रात्री रानटी हत्तींनी उसेगाव व राजगाटा परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त केली. वनविभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, पीडित शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार भरपाई मिळेल, असे चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांनी सांगितले. या कळपात ३३ हत्ती असून, ते रात्री परिसरातील गावांमध्ये भटकतात. त्यानंतर ते देलोडा परिसरातील पहाडावर जातात, अशी माहितीही सोनटक्के यांनी दिली.

साहित्याचे नुकसान झाल्यास अत्यल्प भरपाई

रानटी हत्ती कळपाने येत असल्याने पिकांबरोबरच ते शेतातील मोटारपंप, सोलर प्लेट व अन्य शेतीपयोगी साहित्याची तोडफोड करतात. परंतु अशा महागड्या साहित्याची तोडफोड होऊनही वनविभागाकडून जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्यात येते. त्यामुळे शासनाने परिपत्रकात बदल करुन भरपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT