गडचिरोली : जंगलात गुरे चारावयास गेलेल्या शेतकऱ्यास रानटी हत्तीने सोंडेने उचलून ठार केले. ही घटना गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुराचुरा बिटातील जंगलात बुधवारी (दि.१०) संध्याकाळी घडली. वामन मारोती गेडाम (वय-६२, रा. चुरचुरा माल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वामन गेडाम हे बुधावरी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चुरचुरा-पिपरटोला जंगलात स्वमालकीची गुरे चारण्यासाठी गेले होते. सोबतच त्यांचा लहान भाऊ महादेव गेडाम व हिराजी खोब्रागडे हेदेखील होते. दिवसभर गुरे चारल्यानंतर संध्याकाळी गावाकडे परत येताना अचानक हत्तींचा कळप आला. त्यामुळे महादेव गेडाम व हिराजी खोब्रागडे हे पळत सुटले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, वामन गेडाम हे हत्तीच्या तावडीत सापडले. एका हत्तीने त्यांना सोंडेने उचलून खाली आदळले. यात ते जागीच ठार झाले. घटनेनंतर पोर्ला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
गेडाम बंधू व खोब्रागडे यांना हत्तीचा कळप रस्ता ओलांडून उत्तर दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते पिपरटोला-चुरचुरा रस्त्याने गावाकडे येत होते. मात्र अचानक दक्षिण दिशेने हत्तींचा कळप आल्याने घात झाला.
मागील दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी सात जणांचा बळी घेतला आहे. १६ सप्टेंबर २०२३ ला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. त्याच वर्षी १७ ऑक्टोबरला गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील शेतकरी होमाजी गुरनुले, तर नंतर मरेगाव येथील मनोज गुरनुले या शेतकऱ्यास हत्तीने शेतात ठार मारले होते. २०२४ च्या उन्हाळ्यात भामरागड तालुक्यातील हिदूर येथील दोन महिलांचाही हत्तीने बळी घेतला होता. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०४ रोजी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत आबापूर गावाजवळच्या जंगलात रानटी हत्तीने श्रीकांत रामचंद्र सतरे नामक युवकास ठार केले होते. आता चुरचुरा येथे वामन गेडाम यांना ठार केले आहे.