गडचिरोली : सततच्या छळाला कंटाळून पत्नीने मुलाच्या साह्याने काठीने प्रहार करत पतीचा खून केल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबूर गावात घडली. प्रितम बहादूर एक्का(५०) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रितमची पत्नी मानती एक्का(४०) व मुलगा जोसेफ एक्का(२२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रितम एक्का हा नेहमी मद्यप्राशन करून कुटुंबीयांना त्रास देत होता. बरेचदा तो पत्नीला मारहाणही करायचा. याचसंदर्भात २०२२ साली प्रितमवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सोमवारी १७ मार्चला सकाळी प्रितम एक्का हा आरेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी गेला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो मद्य प्राशन करुन घरी परतला. तेव्हा प्रितमची पत्नी मानती ही जेवण करीत होती. एचढ्यात प्रितमने पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यामुळे मानतीने प्रितमवर लाकडी दांड्याने वार केला. नंतर मुलगा जोसेफ यानेही वार केला. त्यामुळे प्रितमचा जागीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी गावातील बहुतांश नागरिक जंगलात गेले होते. त्यामुळे कुणालाच कुणकुण लागली नाही. दुपारी प्रितमची आई मानकुंवारी एक्का जंगलातून घरी परतल्यावर तिला प्रितमचा मृतदेह आढळून आला. दुसऱ्या दिवशी फिर्याद नोंदविल्यानंतर भामरागड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या नेतृत्वात घटनेचा तपास सुरु आहे.