गडचिरोली : दिरंगी-फुलणार जंगलातील चकमकीत एका पोलिस शिपायाची आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातील आरेवाडाच्या जंगलातून अटक केली आहे.
केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा(वय २३) व रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी(वय ३२) अशी अटकेतील नक्षल्यांची नावे आहेत. केलू मडकाम हा छत्तीसगड राज्यातील मुरकूम येथील रहिवासी असून, तो कंपनी क्रमांक १० चा पीपीसीएम आहे. रमा कोरचा ही एटापल्ली तालुक्यातील मेंढरी येथील रहिवासी आहे. ती भामरागड दलमची सदस्य आहे. आरेवाडा परिसरात पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ते फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.
११ फेब्रुवारीला दिरंगी-फुलणार जंगलात झालेल्या चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. केलू मडकामवर चकमकीचे ४ आणि जाळपोळीचा एक अशा एकूण ५ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.रमा कोरचा हिच्यावर चकमकीचे ८ आणि खुनाचे ४ असे १२ गुन्हे दाखल आहेत. १ फेब्रुवारीला भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या झाली. त्यात रमाचा प्रत्यक्ष सहभाग होता, शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असे पोलिसांनी सांगितले. सध्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल रुजू झाल्यापासून जानेवारी २०२२ ते आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ९२ नक्षल्यांना अटक केली आहे.
केलू मडकाम हा २०१६ मध्ये छत्तीसगडमधील पामेड दलममध्ये भरती झाला. दुसऱ्या वर्षीपासून नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक म्हणून रुजू झाला. २०२१ मध्ये मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार झाला. त्यावेळी केलू मडकाम जखमी झाला होता. अबुझमाडमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो दंडकारण्य समितीचे रुपेश व प्रभाकर यांच्या सोबत काम करीत होता. रमा कोरचा ही २०११ मध्ये चेतना नाट्य मंचमध्ये भरती झाली. २०१३ पासून २०२३ पर्यंत ती गट्टा दलममध्ये कार्यरत होती. त्यानंतर तिची बदली भामरागड दलममध्ये करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट दाओ किंडो, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.