गडचिरोली

गडचिरोली : विद्युत प्रवाहाच्या साह्याने वाघाची शिकार

backup backup

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जंगलात विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याची घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. मृत वाघाचे तोंड आणि तीन पंजे गायब असल्याने या घटनेत शिकार करणाऱ्या टोळीचा हात तर नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

गडचिरोली वन विभागांतर्गत चातगाव वनपरिक्षेत्रातील जंगलात वाघाचा वावर असून, काही जण ठारदेखील झाले आहेत. विशेषत: अमिर्झा बिटात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. अशातच आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका गुराख्याला जंगलात वाघ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्याने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर वनाधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा व अन्य वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.मृत वाघाचे तीन पंजे, तोंडाचा जबडा आणि मिशा  गायब होत्या. शिवाय विद्युत प्रवाहाच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे तपास करीत आहेत.विद्युत प्रवाह रानटी डुकरांसाठी सोडला होता की वाघाची शिकार करण्यासाठी, हे तपासाअंती कळेल. मृत वाघाचे वय ३ ते ४ वर्षे असून, विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष भोयर यांनी काढला आहे, अशी माहिती वनविभागाने आज संध्याकाळी उशिरा काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बावरिया टोळीचा हात?

बावरिया टोळी वाघाची शिकार करण्यात निष्णात असून, यंदाच्या उन्हाळ्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास पाच वाघांची शिकार केल्याप्रकरणी १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. ही टोळी पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमिर्झा बिटात झालेल्या वाघाच्या शिकारीत बावरिया टोळीचा हात आहे की आणखी कुणाचा, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.

SCROLL FOR NEXT