Tawve Forest Maoist Explosives Seized Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Maoist Explosives Seized | टव्वे जंगलात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य पोलिसांकडून जप्त

गडचिरोली पोलीस दलाची विशेष मोहीम; ११ कुकर, गन पावडर, डेटोनेटरसह विविध साहित्य हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

Tawve Forest Maoist Explosives Seized

गडचिरोली : माओवाद्यांनी सुरक्षा दलांचा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गॅरापत्ती पोलिस ठाण्यांतर्गत टव्वे येथील जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य पोलीस दलाने हुडकून काढले आहे. यात स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे ११ कुकर, तीन किलो गन पावडर, चार डेटोनेटर यांसह अन्य माओवादी साहित्याचा समावेश आहे. ४ नोव्हेंबरला विशेष शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

पूर्वी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी तसेच विविध घातपाती कारवायांसाठी माओवादी जंगलात स्फोटके तयार करुन ती जमिनीत पुरुन ठेवत असत. आता माओवादी कारवाया संपल्यानंतर पोलिस शोधमोहीम राबवून असे साहित्य हुडकून काढत आहेत. टव्वे जंगलातही स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली येथील विशेष अभियान पथक आणि प्राणहिता येथील चार तुकड्या तसेच बीडीडीएसच्या दोन पथकांनी शोध मोहीम राबविली.

यावेळी त्यांनी ११ कुकर, १०० फुटांचे कॉर्टेक्स वायरचे तीन बंडल, तीन किलो गन पावडर, चार डेटोनेटर, १२ व्होल्टची एक बॅटरी, २५० ग्रॅम फटाक्यांची दारू, चार स्टील कंटेनर, वायरचे आठ बंडल, एक सोलर प्लेट आणि इतर माओवादी साहित्य बाहेर काढले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT