हजारो शेतकऱ्यांचे  जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन 
गडचिरोली

Gadchiroli News | स्टील हबसाठीच्या जमीन अधिग्रहणास विरोध : हजारो शेतकऱ्यांचे  जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन

स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरु असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात ठिय्या आंदोलनास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या हेतूने प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरु असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन प्रारंभ केले.

आज हजारो शेतकरी, महिला आणि मुले बैलगाड्यांसह तसेच मिळेल त्या साधनाने शिदोरी आणि स्वयंपाकाचे साहित्य घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहचले. त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसरात बॅरिकेट्स लावून तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

शासन ऐकत नाही म्हणून आंदोलन: महेंद्र ब्राम्हणवाडे

सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

या गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीकरिता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे.  तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांतील जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश जारी केला आहे. याविरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT