Dhanora Ashram School Student Death Case
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) स्वयंस्फूर्त दखल घेतली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
१० ऑगस्टच्या मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या गडचिरोलीत उपचार घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या घटनेची माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली वृत्ते आयोगाने गांभीर्याने घेतली आहेत.
वसतिगृहात पुरेशा खाटा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत होते. एका खोलीत तब्बल ७९ विद्यार्थिनी राहत होत्या. अनेक वर्षांपासून हे वसतिगृह कार्यरत असून, तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही माध्यमांनी निदर्शनास आणून दिले होते. या वृत्तांच्या आधारे, विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे निरीक्षण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोंदविले आहे.
आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. या अहवालात सर्पदंश झालेल्या जखमी विद्यार्थिनींची सद्यःस्थिती आणि त्यांना देण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणामुळे गडचिरोलीतील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला