Sironcha bike trolley collision child killed
गडचिरोली: रक्षाबंधनासाठी सिरोंचाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटारसायकलवरील ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर वडील आणि आई जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना आज (दि.९) सकाळी सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे घडली.
शौर्य संतोष कोकू (वय ८) असे मृत बालकाचे नाव असून, संतोष रामलू कोकू (वय ४३) व सौंदर्या संतोष कोकू (वय ३६) अशी जखमींची नावे आहेत. असरअली येथील संतोष कोकू हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सिरोंचा येथे रक्षाबंधनासाठी जात होते. अंकिसा येथे पोहचताच गावात रामकृष्ण चिरला यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. परंतु रस्ता अरुंद असल्याने संतोष कोकू यांचे नियंत्रण सुटून मोटारसायकल ट्रॉलीला धडकली. यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला.
संतोष कोकू यांचा डावा हात आणि पाय मोडला, तर सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या. संतोष कोकू यांच्यावर सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तेलंगणातील वारंगळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे असरअली व सिरोंचात शोककळा पसरली आहे.