Shiv Sena internal conflict Gadchiroli
गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी आज (दि. ७) शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर दोन जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हमरीतुमरी झाली. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
सुरुवातीपासून राकेश बेलसरे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यानंतर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपनेते व शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नव्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करुन पक्षात प्राण ओतण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुणतुर्क नेते संदीप ठाकूर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे वादाला तोंड फुटले. कलह वाढत गेल्यानंतर ठाकूर यांच्याकडे गडचिरोली विभागाची, तर राकेश बेलसरे यांच्याकडे अहेरी विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना नाराजीचा सूर उमटू लागला.
अशातच आज शिक्षणमंत्री दादाजी भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते सर्किट हाऊसमध्ये गेले. तेथे त्यांनी पाच मिनिटे थांबून शिवसेना पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर ते चंद्रपूरला जाण्यास निघाले. भुसेंनी सर्किट हाऊस सोडताच संदीप ठाकूर व राकेश बेलसरे यांच्यात हमरीतुमरी झाली. समर्थकही एकमेकांवर भिडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना वाद मारहाणीपर्यंत पोहचल्याने शिंदेसेनेला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.