Talwada Tractor Bike Collision  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Accident | तलवाडाजवळ ट्रॅक्टरची दुचाकीला धडक: दाम्पत्य ठार, युवक गंभीर जखमी

आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Talwada Tractor Bike Collision

गडचिरोली : ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने पती व पत्नी ठार, तर युवक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.७) संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ घडली. कुम्मा महारु पुंगाटी (५६) व मिडको कुम्मा पुंगाटी (४८) रा.महाकापाडी, ता.भामरागड अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या अपघातात आशिष चंदू महाका (१७) रा.परायणार हा गंभीर जखमी झाला असून, त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

कुम्मा व मिडको हे गुरुवारी काही कामानिमित्त आलापल्लीला आले होते. संध्याकाळी मोटारसायकलने ते आपल्या गावाकडे जाण्यास निघाले. तलवाडा येथे पोहचताच तेथे आशिष महाका हा तरुण बसची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसले. आशिष हा नातेवाईक असल्याने तो दिसताच कुम्मा पुंगाटी यांनी त्याला मोटारसायकलवर बसवून पुढचा प्रवास सुरु केला. दोन किलोमीटर अंतरावर जाताच ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ये-जा करणाऱ्या नागरिकांनी टायगर ग्रूपचे साई तुलसीगिरी यांना माहिती दिली.

त्यानंतर साई तुलसीगिरी व समीर शेख हे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. तेथे कुम्मा हे जागीच ठार झाले होते, तर मिडको आणि आशिष हे विव्हळत होते. परंतु त्याचवेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर झाडं कोसळली होती. वीजपुरवठाही खंडित झाला होता. अशाही परिस्थितीत टायगर ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी मिडको व आशिषला घेऊन आलापल्लीकडे आगेकूच केली. परंतु वाटेतच मिडकोने प्राण सोडला. आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले.

पुण्यात शिकत होता आशिष

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आशिषने पुण्यात अकराव्या वर्गात प्रवेश घेतला होता. अकरावीची परीक्षा आटोपल्याने तो गावाकडे येत होता. तलवाडा येथे काकांकडे थांबल्यानंतर तो गावाकडे जाण्यास निघाला होता. पुंगाटी यांनी त्याला लिफ्ट दिली. परंतु त्यालाही अपघातास सामोरे जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT