Gadchiroli News : गडचिरोलीत रस्ते अपघातांतील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट! 
गडचिरोली

Gadchiroli News : गडचिरोलीत रस्ते अपघातांतील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट!

मागील वर्षीपेक्षा ३३ मृत्यू कमी, वाहतूकविषयक प्रभावी उपाययोजनांचा परिपाक

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. २०२५ मध्ये या कालावधीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता, तर यंदा ही संख्या ८८ झाली असून, ३३ मृत्यू कमी झाले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने राबविलेल्या रस्ते सुरक्षा उपाययोजनांचे हे सकारात्मक फलित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या सप्टेंबर २०२६ अखेरच्या तुलनात्मक अहवालानुसार, जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ३३ मृत्यू कमी नोंदविण्यात आले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यात अपघातांत ११८ जणांचा मृत्यू झाला होता. मागील दोन्ही वर्षांच्या समान कालावधीच्या तुलनेत यंदा मृत्यूंची संख्या कमी झाली आहे.

अपघात प्रतिबंधासाठी जिल्हाभरात वाहनांचा वेग दर्शविणारे १५ ‘डायनॅमिक स्पीड इंडिकेटर’ बसविण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त ४० पोलीस अंमलदार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, अपघातप्रवण ३४ ठिकाणी रस्ते सुरक्षेसंबंधी दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्या असून वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वाहन तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अंगावर परिधान करता येणारे ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला. परिवहन आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून राबविलेल्या या प्रयत्नांमुळे अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत झाल्याचे मोरे यांनी सांगितले.

राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातांत ११ हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला होता. सन २०२६ मध्ये याच कालावधीत ही संख्या ११ हजार ३२६ झाली आहे. राज्यातील सुमारे ५ टक्के घटीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील २७ टक्के घट लक्षणीय आहे.

रस्ते सुरक्षेसाठी प्रशासकीय प्रयत्नांबरोबरच वाहनचालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा. वाहतूक नियमांचे पालन करून प्रत्येकाने अपघात प्रतिबंधासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT