Gadchiroli UPSC Success
गडचिरोली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच सिव्हील सर्व्हीसेस परीक्षेचा निकाल घोषित केला असून, यात गडचिरोलीचे रहिवासी रजत सुनील वाळके यांनी देशभरातून ५१४ व्या क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
पहिली ते बारावीपर्यंत गडचिरोलीत शिक्षण घेतलेल्या रजत यांनी शिकवणी वर्ग न लावता २०१३ मध्ये जेईई ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरच्या व्हीएनआयटी महाविद्यालयातून त्यांनी संगणकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. २०१८ मध्ये यूपीएससीची सीएपीएफ ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची ओरिसा राज्यातील कंदमहल येथे केंद्रीय राखीव दलाचे असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली.
परंतु कोवीडमुळे प्रत्यक्षात ते या नोकरीवर २०२२ मध्ये रुजू झाले. २०२२ पूर्वी दिल्लीत दररोज १२ ते १५ तास यूपीएससीचा अभ्यास केला. याच सुमारास त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु खचून न जाता त्यांनी परिश्रम करणे सुरुच ठेवले. नोकरीत रुजू झाल्यानंतर जबाबदारी व धावपळीची नोकरी सांभाळून घरीच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करुन ती उत्तीर्ण केली. 'राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध' हा त्यांच्या परीक्षेचा ऐच्छिक विषय होता.
जवळपास ७ लाख उमेदवारांनी २०२५ ची सिव्हील सर्व्हीसेसची परीक्षा दिली होती. त्यापैकी एक हजार उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यात रजत यांना ५१४ वा रँक मिळाला. यंदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे गडचिरोली जिल्ह्यातील ते एकमेव उमेदवार आहेत.
यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रजत यांनी 'ड्रीम बिग, स्टार्ट टुडे' असा संदेश दिला. पदवी पूर्ण करताच यूपीएससीच्या तयारीला प्रारंभ करावा. तसेच आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन अभ्यासही करावा, असे रजत म्हणाले.