गडचिरोली : हिंसक कारवायांमुळे नक्षल्यांचा खरा चेहरा उघड झाल्याने आणि दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत चालला आहे. या अनुषंगाने भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत पोयारकोठी आणि मरकनार येथील गावकऱ्यांनी नक्षल्यांना गावबंदी करण्याचा ठराव पारित केला आहे.
९ फेब्रुवारीला कोठी पोलिस ठाण्यात पोलिसांनी ग्रामस्थांची जनसंपर्क सभा आयोजित करुन विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याच बैठकीत मरकनार येथील नागरिकांनी नक्षल गावबंदीचा ठराव घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना सादर केला होता.
त्यानंतर आज(ता.२०) पोयारकोठीच्या नागरिकांनी बैठक घेतली. या बैठकीला ७० ते ७५ नागरिक उपस्थित होते. त्यांनी नक्षल गावबंदीचा ठराव घेऊन कोठी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला. जिल्हा नक्षलवादमुक्त करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.
२००३ पासून महाराष्ट्र सरकारने नक्षल गावबंदी योजना सुरु केली आहे. मागील काही महिन्यांत दुर्गम भागातील २० गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे. भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, कोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी नक्षल गावबंदीसाठी महत्वाची भूमिका बजावली. नक्षल गावबंदी केल्याबद्दल नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश यांनी पोयारकोठी व मरकनार येथील गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
यापुढे गावातील कुणीही नक्षल्यांना जेवण, राशन, पाणी देणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही, गावातील युवक, युवती नक्षल संघटनेत सहभागी होणार नाही, त्यांचे कुठलेही प्रशिक्षणसुद्धा घेणार नाही, गावानजीकच्या जंगलात त्यांना थांबू देणार नाही, त्यांच्या बैठकांना जाणार नाही, असा निर्धार केला.
पोयारकोठी आणि मरकनार ही दोन्ही गावे अनेक वर्षे नक्षल्यांच्या दहशतीत होती. दुर्गम भागात आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेली ही गावे नक्षल्यांचा बालेकिल्ला समजण्यात येणाऱ्या अबुझमाड परिसराला लागून आहेत. त्यामुळे या गावांमध्ये नक्षल्यांची दहशत होती. परंतु पोलिसांनी गावकऱ्यांच्या बैठका घेऊन प्रशासन विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांचा पोलिस दलाप्रती विश्वास वाढला आणि त्यांनी नक्षल गावबंदीचा ठराव घेतला.