गडचिरोली: पूर्वाश्रमीच्या एकत्रित शिवसेनेत मागील ३५ वर्षांपासून कार्यरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे कात्रटवार यांनी म्हटले आहे.
महेश केदारी हे जिल्हा संपर्क झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेत स्थान नसणाऱ्या आणि लांगुलचालन करणाऱ्यांना जवळ करुन आपली पोळी शेकत असल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला आहे. कात्रटवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्हाभरात ओळखले जात होते. त्यांनी आजवर अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. परंतु पक्षाच्या संपर्कप्रमुखांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने त्यांनी दु:खी अंतकरणाने शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अरविंद कात्रटवार यांनी गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. परंतु संपर्कप्रमुखांशी पटत नसल्याने आपणास तिकिट मिळणार नाही, अशी हवा लागल्याने कात्रटवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
एकेकाळी शिवसेनेचा विदर्भ बालेकिल्ला होता. १९९० मध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रांसह नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा व अन्य जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. रामटेक, अमरावती येथे शिवसेनेचे खासदारही होते. परंतु त्यानंतर भाजपने शिवसेनेला पद्धतशिरपणे गिळंकृत केले. हळूहळू शिवसेनेची पकड सैल झाली. पक्ष नेतृत्वही विदर्भाकडे दुर्लक्ष करु लागले.
बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर, गडचिरोलीचा दौरा केला नाही. प्रचंड स्कोप असूनही पक्ष नेतृत्व पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आणि केवळ संपर्कप्रमुखांवर विश्वास दाखवत असल्याने अनेक जांबाज शिवसैनिक पक्षाला सोडून गेले आहेत. चार महिन्यांपूर्वी शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल हे आपल्या सहकाऱ्यांसह उबाठा सोडून शिंदे सेनेत गेले. त्यानंतर आता कात्रटवारांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचंड स्कोप असतानाही नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उबाठाला मोठा फटका सहन करावा लागेल, असे बोलले जात आहे.