Family Planning Surgery Naxals Gadchiroli
गडचिरोली : पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेल्या १४ नक्षल्यांची नसबंदी खुली करण्याची करण्याची शस्त्रक्रिया अलीकडेच करण्यात आली. यामुळे मुलाबाळांविना अनेक वर्षे जंगलात खडतर आयुष्य घालविलेल्या नक्षल्यांना संजीवनी मिळाली असून, त्यांना आता सांसारिक सुख भोगता येणार आहे.
नक्षल चळवळीच्या नियमानुसार नक्षल दलममध्ये भरती होणाऱ्या सदस्यांना क्वचितप्रसंगी लग्न करण्याची मुभा असते. परंतु त्यांची नसबंदी करण्यात येत असल्याने त्यांना मुलं होत नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांनी नक्षल दलममध्ये अनेक वर्षे मुलाबाळांविना काढावी लागली. यातील अनेक जणांनी पोलिसांपुढे वेगवेगळ्या वेळी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांना सांसारिक सुख उपभोगता यावे, यासाठी गडचिरोली पोलिस आणि 'सर्च' फाउंडेशनने पुढाकार घेत प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत सर्चच्या चातगाव येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २१ मार्चला नसबंदी खुली करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात गडचिरेाली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेल्या १३ व गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या १ अशा एकूण १४ नक्षल्यांचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी सर्च फाउंडेशनचे पद्मश्री डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनात मुंबईच्या लीलावती रुग्णालयाचे डॉ.श्रीरंग पुरोहित, डॉ.सुशील नेहेते, डॉ.लीना जैन, डॉ.वर्षा बारई, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.नागसेन साखरे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. आतापर्यंत ५० आत्मसमर्पित नक्षल्यांची नसबंदी खुली करण्यात आली असून, पूर्वी नसबंदी खुली केलेल्या ३६ आत्मसमर्पित नक्षल्यांपैकी १३ जणांना अपत्येही प्राप्त झाली आहेत. पहिल्यांदा शस्तरक्रिया झालेल्यांना सर्वसामान्य नागरिकांसारखे कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य होणार असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशिल असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.
आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी पोलिस विभागाने चार स्वतंत्र व सुसज्ज रो-हाऊसेसचे बांधकाम हाती घेतले आहे. शिवाय ७२ जणांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबच मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन, वेल्डर, तंत्रज्ञ, ऑपरेटर असे प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात आला आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन गृहप्रकल्प उभारणे, त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड इत्यादी ओळखपत्रेही देण्यात आली आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनात आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल, पोलिस उपनिरीक्षक संतोष कोळी व अंमलदारांकडून हे उपक्रम राबविले जात आहेत.