Gadchiroli Naxalite Smarak demolition
गडचिरोली : शहीद सप्ताह व अन्य वेळी दुर्गम भागातील जंगलात नक्षल्यांनी उभारलेली ४४ स्मारके पोलिसांनी बुधवारी (दि.१८) एकाच दिवशी उद्ध्वस्त केली. यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये असलेली भीती कमी होण्यास मदत होणार आहे.
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते मृत नक्षल्यांची स्मारके उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. दुर्गम भागात अजूनही अनेक ठिकाणी ही स्मारके असल्याने नागरिकांना भीती वाटत असते. ही भीती काढून घेण्यासाठी पोलिस नक्षल्यांची स्मारके उद्ध्वस्त करीत असतात. परंतु पोलिसांचे सी-६० पथके, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि जिल्हा पोलिसांच्या १८ पथकातील ८०० जवानांनी विशेष अभियान राबवून आज वेगवेगळ्या भागातील जंगलात उभारलेली ४४ स्मारके एकाच दिवशी पोलिसांनी नष्ट केली.
यात एटापल्ली उपविभागीतल १८, हेडरी उपविभागातील १७, भामरागड उपविभागातील ७, जिमलगट्टा उपविभागातील २ आणि धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एका स्मारकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नक्षल्यांचे आश्रयस्थान असलेल्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा(जांभिया) परिसरातील ही स्मारके उद्ध्वस्त केल्याने आता सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ जवळपास संपली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशिल आहे. पोलिस खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहील- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक