गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीदारम्यान घातपात घडवून आणण्याच्या हेतूने नक्षल्यांनी गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर आयोजित केलेले शिबिर पोलिसांनी उदध्वस्त केले. पेंढरी उपपोलिस ठाण्यापासून १२ किलोमीटर अंतरावरील चुटीनटोला गावाजवळ हे शिबिर घेण्यात येत होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान छत्तीसगडमधील औंधी दनमचे नक्षलवादी हिंसक कारवाया करण्याच्या हेतूने एक शिबिर आयोजित करणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यापासून पूर्वेस १२ किलोमीटर अंतरावरील चुटीनटोला गावाजवळच्या जंगलात नक्षली तळ ठोकून होते. छत्तीसगडमधील मानपूर जिल्ह्यातील हे शिबिर होते.
ही माहिती मिळताच शनिवारी ३० मार्चला अतिरिक्त पोलिस अधीक्ष्क यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर सुरु असलेल्या परिसरात अभियान राबविले. जवळपास अर्धा किलोमीटर उंच टेकडीवर पोलिस पोहताच तेथे नक्षल्यांची छावणी आढळून आली. मात्र, नक्षलवादी तेथून निघून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाहून कॉडेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन कांड्या, बॅटऱ्या, वॉकीटॉकी चार्जर इत्यादी साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान पुन्हा तीव्र केले आहे.