गडचिरोली : कबुतर चोरल्याच्या संशयावरुन एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण केली. ही घटना आज (दि.६) देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे.
आमगाव येथील काही चिमुकल्यांनी कबुतर चोरले, असा संशय घेऊन विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर नरेश बगमारे यांच्या तक्रारीवरुन देसाईगंज पोलिसांनी त्या बालकावर कलम ११८(१), ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता बाल न्यायालय मंडळाच्या मुख्य न्यायाधीशांनी १४ ऑगस्टपर्यंत निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या चिमुकल्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.