Pearlkota River Flood
गडचिरोली : भामरागड गावात शिरलेले पुराचे पाणी ओसरले असून, तेथे प्रशासनाच्या वतीने स्वच्छता व आरोग्य तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, सोमवारी (दि.२८) संध्याकाळपर्यंत पर्लकोटा नदीच्या जुन्या पुलावरुन काही प्रमाणात पाणी वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक चौथ्या दिवशीही बंदच होती.
भामरागड गावातील पूर ओसरताच तेथे साचलेला गाळ, चिखल आणि कचरा साफ करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवाय निर्जंतुकीकरण आणि नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. दरम्यान भामरागड-लाहेरी मार्ग सुरु झाला असून, बिनागुंडा परिसरातील काही नाल्यांना अजूनही पूर असल्याने तेथील वाहतूक ठप्पच असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.