Parlokota river flood Bhamragad waterlogging
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागड तालुक्याची सीमा ओलांडताच छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते. तेथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने इंद्रावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. परिणामी पर्लकोटा नदीला पूर आला असून, जुन्या पुलावरुन पुराचे पाणी वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने ३० ते ३५ दुकाने पाण्याखाली आहेत. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्तीसगडमधील पाऊस लक्षात घेता संभाव्य स्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सुचनेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे पाठविण्यात आले. प्रशासनाने आधीच सतर्कता बाळगत तेथील दुकानदारांचे साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने नुकसान टळले आहे. सध्या गावातील पूर संथ गतीने ओसरत असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.
भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील अर्चना विकास तिम्मा या गर्भवती महिलेला काल रात्री प्रसूतीच्या कळा आल्या. परंतु वाटेत पामुलगौतम नदीला पूर आल्याने तिला दवाखान्यात जाणे शक्य नव्हते. ही बाब कळताच प्रशासन तिच्या मदतीला धावून गेले. आज पहाटे ४ वाजता एसडीआरएफच्या चमूने तिला बोटीद्वारे नदीतून सुरक्षितरित्या बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. आज सकाळी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.