गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : घरामागच्या परसबागेत रानडुकराने हल्ला केल्याने एक वृद्ध ठार झाला. अहेरी तालुक्यातील बोटलाचेरु येथे गुरुवारी (दि.१४) संध्याकाळी ही घटना घडली. विस्तारी शिवय्या जक्कुलवार (६५) असे मृत इसमाचे नाव आहे. विस्तारी जक्कुलवार हे आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते. घरामागच्या परसबागेत त्यांनी मक्याची लागवड केली होती. गुरुवारी संध्याकाळी बागेत काही जनावरे शिरल्याचा आवाज येताच जक्कुलवार तिकडे गेले.
एवढ्यात रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनाधिकारी रविकांत ढेंगळे, वनपरिक्षेत्राधिकारी आरती मडावी यांनी बोटलाचेरु येथे भेट देऊन पंचनामा केला. ऐन पोळ्याच्या दिवशी वृद्ध मजुराचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.