गडचिरोली

Gadchiroli News : रानटी हत्तीच्या हल्ल्यात एक जण ठार

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : रानटी हत्तीने एका सायकलस्वार इसमास ठार केल्याची घटना बुधवारी (दि. ८) संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावरील चांदाळा-मेंढा मार्गावर घडली. धनराज पुंजीराम मडावी(३५) असे मृत इसमाचे नाव असून, तो मेंढा(बोदली) येथील रहिवासी होता.

धनराज मडावी हा आज संध्याकाळी सायकलने चांदाळा येथे गेला होता. हा परिसर जंगलव्याप्त असून, तेथे रानटी हत्तींचा वावर असल्याने काही जण जंगलातील रस्त्यावर हत्ती पाहात होते. धनराज मडावी हादेखील थांबला. एवढ्यात हत्ती आल्याने इतर जण पळून गेले. मात्र, धनराज तेथेच होता. त्याला हत्तीने तुडवून ठार केले, असे नागरिकांनी सांगितले. घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

गुरवळा, विहीरगाव, चांदाळा परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून जवळपास ३० रानटी हत्तींचा कळप फिरत आहे. त्यात टस्कर हत्तीदेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करु नये, मोठ्याने आवाज करु नये, हॉर्न वाजवू नये किंवा हत्तींना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. परंतु या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने अप्रिय घटना घडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT