गडचिरोली : कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या महोत्सवात आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. प्रसिद्ध आचारी विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वात तब्बल ११११ किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्ये, विशेषतः नाचणी पिकाचे पोषणमूल्य आणि महत्त्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.
नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या या महाकाय शिऱ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे. या विक्रमासाठी वापरण्यात आलेली नाचणी ही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शाश्वत पद्धतीने उत्पादित करण्यात आली होती.
शिरा तयार करताना पाणी, गूळ, तूप, चारोळी, ड्रायफ्रुट्स आदी पारंपरिक व पौष्टिक घटकांचा वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष उपस्थित राहून रेकॉर्ड संस्थांच्या प्रतिनिधींनी काटेकोर तपासणी केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी एम. अरूण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद जवान व शेतकऱ्यांना विश्वविक्रम अर्पण
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संकल्पनेतून कोया कृषी मेळाव्यात नाचणीचा हलवा तयार करण्यास मिळाला, हे माझं भाग्य समजतो. या हलव्यासाठी वापरलेले पदार्थ येथील शेतकऱ्यांनीच पिकविलेले होते. नाचणीचं महत्व सर्वांना कळावं आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करावेत, या हेतूनं हा विश्मविक्रम करण्यात आला. गडचिरोलीसारख्या गावात हा प्रयोग झाला. त्यामुळे हा विश्वविक्रम ३४ वा असला तरी तो पहिलाच आहे, असं मला वाटतं, असं सांगून विष्णू मनोहर यांनी हा विश्वविक्रम नुकतेच नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान दीपक मडावी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्पण केला.