गडचिरोली : राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही सांगत असले; तरी त्यांच्याच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास होत नसून, विनाशाकडे वाटचाल सरू आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज (दि. 15) पार पडली, त्यावेळी मारकवार बोलत होते. अध्यक्षस्थानी देसाईगंज तालुका सचिव परसराम आदे हे होते. राज्य सरकार जनविरोधी कायदे करून शेतकरी, मजूर व कामगारांना लुटण्याचे काम करीत आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचे संवैधानिक अधिकार नाकारण्याचा डाव सरकार आखत आहे,’ असा आरोप करण्यात आला.
‘मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचा विकास होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात. मात्र, विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हा विकास नसून, विनाश आहे,’ अशी टीका कॉ. मारकवार यांनी केली.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, डॉ.अशोक ढवळे, कॉ. अजित नवले हे १७ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून, ते आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांसंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती मारकवार यांनी दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या बैठकीला तालुका सचिव राजू सातपुते, विठ्ठल प्रधान, किसन राऊत, वासुदेव निखारे, ब्रम्हदास बावणे, बाबूराव मोहुर्ले, भगवान राऊत, सुनील दुमाने, कविता मेश्राम, प्रमोद कोसेकर उपस्थित होते.