Leopard Attack  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli news: कोरचीत बिबट्याची दहशत: चार दिवसांत दोन वासराचा फडशा

या घटनांमुळे भविष्यात आपल्याही जिवाला धोका होऊ शकतो, या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागातील कोरची या स्थळी बिबट्याने मागील चार दिवसांत दोन वासरांचा बळी घेतला,यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. कोरची हे गाव जंगलाने वेढले असून, परिसरात अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो.

अशातच १७ व २० मार्चला वॉर्ड क्रमांक १३ मधील वामन मोहुर्ले यांच्या घराजवळ बिबट्याने दोन वासरांवर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यामुळे दोन्ही वासरे मृत्यूमुखी पडली. घटनेची माहिती मिळताच वनविभाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान आढळलेल्या पायाच्या ठस्यांवरून हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचा प्राथमिक अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

कोरची गावात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असल्याने बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांना सहज भक्ष्य मिळत आहे. मोकाट जनावरांच्या शोधार्थ आलेले हिंस्त्र प्राणी गोठ्यातील जनावरांनाही लक्ष्य करताना दिसत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करुन त्यांना गो शाळेत पाठवावे, अशी मागणी करणारे निवेदन गावकऱ्यांनी यापूर्वीच नगरपंचायतीला दिले आहे.

परंतु नगरपंचायतीकडून या गंभीर विषयावर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. परिणामी बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा धोका वाढतच असून, भविष्यात आपल्याही जिवाला धोका होऊ शकतो, या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT