गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे यांच्या 'आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह' या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार घोषित झाला आहे.
साहित्य परिषदेचा सन २०२५ या वर्षातील विविध साहित्यप्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी लेखकांना पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा मंगळवार २६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, पुणे येथे होणार आहे.
सन २०२५ या वर्षीचा माधुरी वैद्य पुरस्कृत श्रीवत्स प्रकाशनातर्फे देण्यात येणारा विपुलश्री पुरस्कार 'आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह' या संपादित ग्रंथासाठी डॉ.मुनघाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील आदिवासी साहित्याचे वैचारिक अधिष्ठान, चळवळ आणि विविध साहित्यप्रकारातील आदिवासी साहित्याचे वैशिष्ट्य या पुस्तकात अनेक अभ्यासकांनी नोंदवलेले असून, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आलेला आहे.