गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : शहीद सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा या दुर्गम गावातील लालू मालू धुर्वा या ४० वर्षीय तरुणाची पोलिस खब-या असल्याच्या संशयावरून हत्या केली. ही घटना आज (दि.३१) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. (Gadchiroli News)
मंगळवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी लालू धुर्वा यास झोपेतून उठवून बाहेर नेले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. नक्षल्यांनी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली. लालू हा पोलिसांचा खब-या होता. त्याच्या माहितीवरून एकदा आम्हाला कॅम्प सोडून पळावे लागले. त्यामुळे संधी मिळताच त्याची हत्या केली, असे नक्षल्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. त्यावर पीपल्स लिबरेशन गुर्रीला आर्मी असा उल्लेख आहे. (Gadchiroli News)
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. २५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे याची नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली होती. त्यानंतर ही दुसरी हत्या आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. प्रचंड नैराश्यामुळे नक्षलवादी निरपराध नागरिकांचा बळी घेत असल्याचे सांगितले. त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार असल्याचेही ते म्हणाले.