गडचिरोली : जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरु केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे हुडकून काढली आहेत.
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी जंगलात स्फोटक साहित्य आणि शस्त्रे लपवून ठेवत असते. पोलिसांचे दुर्गम भागातील नक्षलविरोधी अभियान, विविध नक्षल सप्ताह आणि निवडणुकीच्या वेळी नक्षलवादी या स्फोटकांचा वापर करीत असत. परंतु पोलिसांनी १६ मे रोजी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत कंपनी क्रमांक १० व अन्य दलमच्या ५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. चौकशीदरम्यान त्यांनी बिनागुंडाच्या जंगलात स्फोटके लपवून ठेवली असून, तेथे शस्त्रे तयार केली जातात, अशी माहिती दिली.
त्यानंतर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज जी, पोलिस उपअधीक्षक(अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शन्ज्ञत् २१ मे रोजी पोलिसांनी जंगलात विशेष अभियान पथक व अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील ६ पथके आणि बॉम्ब शोधक व नाशक विभागाची २ पथके त्या भागात रवाना केली.
हे आढळले साहित्य
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बिनागुंडा गावाच्या उत्तरेकडील जंगलात शोध घेतला असता तेथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके, शस्त्रे आणि अन्य साहित्य आढळून आले. त्यात एक लेथ मशिन, बिजीएल पाईप, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलींग मशिन, जीग सॉ मशिन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फूटबॉल पाईप इत्यादी साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते तेथेच नष्ट केले.