गडचिरोली,: गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत गडचिरोली-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती जंगलातून नक्षल्यांनी जंगलात सुरु केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला.
पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी जंगलात स्फोटक साहित्य आणि शस्त्रे लपवून ठेवत असते. पोलिसांचे दुर्गम भागातील नक्षलविरोधी अभियान, विविध नक्षल सप्ताह आणि निवडणुकीच्या वेळी नक्षलवादी या स्फोटकांचा वापर करीत असत. परंतु पोलिसांनी १६ मे रोजी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी चौकशीदरम्यान गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावरील जंगलात स्फोटके लपवून ठेवली असून, तेथे शस्त्रे तयार केली जातात, अशी माहिती दिली.
त्यानंतर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनात २६ मे रोजी पोलिसांनी जंगलात अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील ४ पथके, बॉम्ब शोधक व नाशक विभागाची २ पथके आणि नारायणपूर येथील डीआरजीचे एक पथक त्या भागात रवाना केले.
हे आढळले साहित्य
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता तेथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके, शस्त्रे आणि अन्य साहित्य आढळून आले. त्यात एक इन्सास रायफल, २ सिंगल शॉट रायफल, २ बारा बोअर रायफल, एसएलआर रायफलची २ जिवंत काडतुसे, ३०३ रायफलची १२ जिवंत काडतुसे, बारा बोअर रायफलची ४ जिवंत काडतुसे, २५ किलोग्रॅम आयईडी स्फोटके, २ क्लेमोरे, ११० डिटोनेटर्स, कॉर्टेक्स वायर, पाचशेहून अधिक बीजीएल सेल, बीजीएल बनविण्याचे साहित्य, ७ बीजीएल लाँचर, ३ ट्यूब लाँचर, लोखंडी सळ्या २ लेथ मशिन, २ मोटर, ग्राइंडर मशिन, इन्व्हर्टर, बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट इत्यादी साहित्य आढळून आले. पोलिसांनी स्फोटक साहित्य घटनास्थळीच नष्ट केले. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडानजीकच्या जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उदध्वस्त केला होता. त्यानंतर पोलिसांना मिळालेलं हे दुसरं यश आहे.