Gadchiroli Naxal leader Bhoopati
गडचिरोली : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य तथा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ अभय याच्यासह आणखी एक केंद्रीय समिती सदस्य, तसेच दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्यांसह ६० नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असून, १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षल्यांचा समूळ नायनाट करण्याचा चंग बांधला आहे. त्याअनुषंगाने यंदा २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल्यांचा देशातील सर्वोच्च नेता तथा माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्यासह २७ नक्षली ठार झाले. त्यानंतर भूपतीला राष्ट्रीय महासचिव बनविले जाईल, अशी चर्चा होती. परंतु केंद्रीय समितीने सप्टेंबर महिन्यात पॉलिट ब्युरो सदस्य थिप्परी तिरुपती उर्फ देवजी याची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली. तेव्हापासून भूपती नाराज होता. त्यानंतर त्याने केंद्र सरकारला शांततेसाठी चर्चेचे आवाहन करुन शस्त्र त्यागाची घोषणा करणारे पत्रक जारी केले होते. मात्र, तेलंगणातील नक्षल नेता जगन याने भूपतीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला होता. विशेष म्हणजे, भूपतीने शस्त्र त्यागाची घोषणा करणारे पत्रक आपल्या फोटोसह प्रकाशित केले होते. तेव्हाच भूपती पोलिसांच्या संपर्कात आला असून, तो आत्मसमर्पण करणार, असा अंदाज आला होता. भूपतीवर विविध राज्यात सुमारे ६ कोटींचे बक्षीस होते.
भूपतीसमवेत नक्षल्यांचे दंडकारण्यातील नेते निखिल, प्रभाकर व राजू यांच्यासह ६० नक्षली आत्मसमर्पण करणार आहेत. भूपतीसारख्या दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भूपती आत्मसमर्पण करणार असल्याच्या बातमीला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दुजोरा दिला असला, तरी 'वेट फॉर टू डेज' असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १५ ऑक्टोबरला आत्मसमर्पण होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.