Gadchiroli Naxal Encounter Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Naxal Encounter: चकमकीत एक नक्षलवादी ठार, जवान जखमी

भामरागड तालुक्यातील फोदेवाडा जंगलात पोलिस–नक्षल चकमक; शस्त्रसाठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला असून सी-६० पथकातील एक जवान जखमी झाला आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली असून, या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे नक्षलवादी तसेच छत्तीसगडमधील काही नक्षलवादी फोदेवाडा परिसरातील जंगलात एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सी-६० पथकाने नक्षलविरोधी अभियान सुरू केले.

४ फेब्रुवारी रोजी दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आज सकाळपासून सी-६० पथकासह केंद्रीय राखीव पोलिस दल व जलद प्रतिसाद पथकाने संयुक्तपणे पुन्हा नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली. या दरम्यान नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक उडाली.

या चकमकीत पोलिसांनी एका नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. मृत नक्षलवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, या कारवाईत आणखी काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, संध्याकाळी झालेल्या दुसऱ्या चकमकीत सी-६० पथकातील एक जवान जखमी झाला आहे. त्याला घटनास्थळावरून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT