गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खाणीविरोधात अनेक वर्षांपासून ग्रामससभांचा लढा सुरु आहे. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने जिल्ह्यातील सर्व लोहखाणी बंद कराव्यात अन्यथा याविरोधात ग्रामसभा एल्गार पुकारतील, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी दिला आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इलाख्यातील दमकोंडावाही पहाड परिसरात हजारो आदिवासी, वननिवासी आणि ग्रामसभा प्रतिनिधींनी एकत्र येत पारंपरिक पूजा-अर्चा केली. यावेळी संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आमच्या पूर्वजांनी जपलेले हे जंगल आम्ही कधीही नष्ट होऊ देणार नाही. जंगल म्हणजे आमचा प्राण, आमचे जीवन, आमची संस्कृती आहे. कोणत्याही परिस्थितीत जल, जंगल, जमीन लुटू दिली जाणार नाही, असा इशारा ग्रामसभांनी दिला. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक, ग्रामसभा, कम्युनिस्ट, रिपब्लीकन पक्ष व निसर्गप्रेमी एकवटणार असल्याची भूमिकाही घेण्यात आली. सरकार आणि कंपन्यांनी जर गडचिरोलीतील खाणकाम त्वरित बंद केले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, भाकपचे तालुका सचिव कॉ.सचिन मोतकुरवार, कॉ.सूरज जक्कुलवार, किसान सभेचे तालुकाध्यक्ष रमेश कवडो, पत्रकार हेमंत डोर्लीकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.