मसेलीच्या आश्रमशाळेतून मध्यरात्री दोन विद्यार्थिनी बेपत्ता! 
गडचिरोली

Gadchiroli News : मसेलीच्या आश्रमशाळेतून मध्यरात्री दोन विद्यार्थिनी बेपत्ता!

सकाळी हजेरीच्या वेळी उघडकीस आला प्रकार, चार तासांत पोलिसांनी शोधले

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : कोरचीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थिनी मध्यरात्री शाळेच्या आवारातून बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.३०) सकाळी हजेरी घेताना समोर आला. या घटनेने खळबळ माजल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत अवघ्या चार तासांत दोन्ही विद्यार्थिनींचा शोध घेतला.

मसेली येथे आदिवासी विद्यार्थ्यांची शासकीय आश्रमशाळा असून, मुले व मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत. मंगळवारी(दि.२९) रात्री सुमारे १२ च्या सुमारास अचानक दोन विद्यार्थिंनी आश्रमशाळेच्या आवारातून बाहेर पडल्या. त्या पायी मसेलीहून कोरची येथे आल्या. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास हजेरी घेताना दोन विद्यार्थिनी बेपत्ता असल्याचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या लक्षात आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यासंदर्भात कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे शोध घेत दोन्ही विद्यार्थिनींना कुरखेडा येथून ताब्यात घेत कोरची पोलिस ठाण्यात आणले.

रात्रीची सुरक्षा व्यवस्था नेमकी काय?

विद्यार्थिनी मध्यरात्री आश्रमशाळेच्या आवारातून बाहेर पडल्या आणि सकाळी आठ वाजतापर्यंत त्याची माहिती प्रशासनाला झाली नाही, ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. रात्री विद्यार्थिनींची उपस्थिती तपासण्यात आली होती का? त्या शाळेच्या आवाराबाहेर कशा गेल्या, प्रवेशद्वारावर रात्रीच्या वेळी देखरेख कोणाची होती, तसेच चौकीदाराची ड्युटी होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असताना या घटनेत नेमकी कुठे त्रुटी राहिली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती

आश्रमशाळेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या हे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. कॅमेरे कार्यरत असते तर विद्यार्थिनी शाळेच्या आवारातून नेमक्या कोणत्या वेळी आणि कोणत्या मार्गाने बाहेर पडल्या, याची माहिती मिळण्यास मदत झाली असती. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यास ती किती दिवसांपासून बंद आहे आणि तिच्या देखभालीची जबाबदारी कोणाची आहे, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

जपतलाईच्या घटनेनंतर पुन्हा सुरक्षेचा मुद्दा

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मसेली आश्रमशाळेतील हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासोबतच त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना असणे आवश्यक आहे. रात्रीची सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती तपासणी, प्रवेशद्वारावरील देखरेख आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याची संबंधित विभागाने तपासणी करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT