Kurkheda Police Arrest Two Thieves
गडचिरोली : घरी कोणी नसल्याची संधी साधून गावातीलच घर फोडून चोरी करणाऱ्या दोघांना कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. वैभव समीर जांभुळकर(२९) व गणेश देविदास भैसारे(३३) दोघेही रा.आंधळी,ता.कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत.
आंधळी येथील अशोककुमार वाघमारे हे १२ ते १५ जून या कालावधीत आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून वैभव जांभुळकर व गणेश भैसारे यांनी वाघमारे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ३ हजार रुपये, मातीच्या भांड्यातील रोख ७ हजार रुपये आणि ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. वाघमारे परत आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला.
परंतु, आरोपींनी घटनास्थळी कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते. परंतु तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभव जांभुळकर व गणेश भैसारे यांना १६ जूनला अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीतील चौकशीदरम्यान दोघांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्यावरुन चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेड्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका आघाव, हवालदार मडावी, कोरे, गुडा, महारे यांनी ही कारवाई केली.