Bribe Case File Photo
गडचिरोली

Gadchiroli Bribe | पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

वनजमिनीच्या पट्ट्याच्या सातबाराची प्रत सही व शिक्क्यानिशी देण्यासाठी शेतकऱ्याकडे पैशांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Kurkheda Talathi Bribe Case

गडचिरोली: वनजमिनीच्या पट्ट्याच्या सातबाराची प्रत सही व शिक्क्यानिशी देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२६) रंगेहाथ पकडून अटक केली. सुलोचना विठ्ठलराव कन्नाके (वय ३८) असे महिला तलाठीचे नाव आहे. ती कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्यास मिळालेल्या वनपट्ट्याच्या जमिनीचा सातबारा मिळावा, यासाठी त्याने ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर त्याने गोठणगावच्या तलाठी कार्यालयात जाऊन सही व शिक्क्यानिशी सातबाराची प्रत मागितली. परंतु तलाठी सुलाचना कन्नाके हिने त्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर काल सापळा रचला असता सुलाचना कन्नाके हिने आपल्या राहत्या घरी तक्रारकर्त्याकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. तिच्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक विक्रांत सगणे, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजू पद्मगिरवार, स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, नुतेश धुर्वे, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT