Korchi Lightning Strike student death
गडचिरोली: कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथील शेतात धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेलेला दहाव्या वर्गातील विद्यार्थी वीज पडून ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. सरगम सोमनाथ कोरचा (वय १७) असे मृत, तर योगेश घावळे (वय १७) असे जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना आज (दि.२५) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
सरगम कोरचा हा मसेली येथील छत्रपती विद्यालयात शिकत होता. सध्या सर्वत्र धान कापणीचा हंगाम सुरु आहे. केसालडाबरी येथील सोमनाथ कोरचा यांच्याही शेतात धान कापणी सुरु होती. परंतु, आज दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाल्याने सोमनाथ कोरचा यांचा मुलगा सरगम हा त्याचा गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा येथील नातेवाईक योगेश घावळे याच्यासह धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेला.
परंतु, पाऊस सुरु असल्याने दोघेही शेतातील मोहाच्या झाडाखाली थांबले होते. सरगमचे वडील सोमनाथ कोरचा हे थोड्या अंतरावर थांबले होते. काही वेळातच झाडावर वीज कोसळल्याने सरगम व योगेश खाली पडले. सोमनाथ कोरचा यांनी गावकऱ्यांना बोलावून दोघांनाही कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी हितेश वंजारी यांनी योगेश घावळे याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्याला चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेमुळे केसालडाबरी व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे. शासनाने सरगमच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस
गडचिरोली दुपारनंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची इत्यादी तालुक्यांमध्ये पाऊस पडल्याने कापलेल्या हलक्या धानाची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.