गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा येथून गडचिरोली जिल्ह्यातील मोहझरी येथे अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रंजित अरुण सरपे (वय २५) व चेतन देवेंद्र झाडे(वय २५, दोघेही रा.मुडझा, ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुडझा येथील महेश हेमके हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह मोहझरी येथील शिवा ताडपल्लीवार याला चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारुचा पुरवठा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरूवारी (दि.२३) रात्री साडेअकरा वाजता गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सापळा रचला. पोलिसांनी समोरुन भरधाव येणारे वाहन अडवून तपासणी केली असता त्यात ३ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारुच्या ४० पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी ही दारु आणि २ लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, अंमलदार प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, माणिक निसार यांनी ही कारवाई केली.