गडचिरोली : भामरागड तालुक्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने लाहेरी-बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याला पूर आला आहे. पुरामुळे नाल्यापलीकडच्या गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे.
गुंडेनूर नाल्यावर मागील वर्षीपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाही त्या परिसरातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. १ जुलैपासून आतापर्यंत भामरागड तालुक्यात १९०.६ मिलिमीटर पाऊस पडला असून, अपेक्षित पावसापेक्षा ही टक्केवारी २५८.९ टक्के एवढी आहे.
नागरिकांनी पुरातून प्रवास करुन धोका पत्करु नये, असे आवाहन तेथील प्रशासनाने केले आहे. आज गडचिरोलीसह जिल्ह्याच्या दुपारी रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.