रामदास जराते Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | गोंडवाना विद्यापीठातील वादग्रस्त नियुक्ती: माओवादी भूपतीच्या समर्थनार्थ शेकापची उडी

राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडण्याचे भाई रामदास जराते यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Gondwana University Appointment

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या एकल उपक्रमाचे समन्वयक म्हणून आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याची झालेली नियुक्ती कायम ठेवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले आहे. भूपती यांच्या नियुक्तीला काही संघटनांकडून होत असलेला विरोध हा द्वेषभावनेतून असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गडचिरोलीसह देशभरात नक्षल चळवळीमुळे पोलीस जवान, नागरिक तसेच नक्षल चळवळीत सहभागी आदिवासींच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. सशस्त्र संघर्ष देशाच्या भविष्यासाठी धोकादायक होता. मात्र आत्मसमर्पण धोरणामुळे अनेक नक्षल कार्यकर्त्यांनी शस्त्रांचा त्याग करून लोकशाही मार्ग स्वीकारला असून, नक्षल चळवळ संपुष्टात येणे ही समाधानाची बाब असल्याचे जराते यांनी पत्रात म्हटले आहे.

आत्मसमर्पण केलेल्या भूपती यांना सन्मानाने जीवन जगण्याचा विश्वास शासनाने दिला होता. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या 'एकल' उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करण्याची दिलेली संधी हे शासनाने आत्मसमर्पण धोरणानुसार पाळलेले सर्वोच्च उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

जल, जंगल, जमीन, ग्रामसभा, पेसा आणि वनाधिकार कायद्यांसंदर्भातील उपक्रमासाठी भूपती यांचा दीर्घ अनुभव उपयुक्त ठरेल, असा दावा करत कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावामुळे त्याची नियुक्ती रद्द करु नये, अशी मागणी जराते यांनी केली आहे.

भूपतीच्या नियुक्तीवर काही ग्रामसभा आणि गोटूल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी कामगार पक्षाने त्याच्या नियुक्तीचे केलेले समर्थन महत्वाचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT