गडचिरोली

Gadchiroli News : नक्षलग्रस्त फुलनार परिसरात सुरू झाले नवीन पोलिस मदत केंद्र

पोलिस मदत केंद्रात वायफास सुविधा, १२ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर सुविधा,

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील फुलणार परिसरातील गुंडुरवाही येथे नवीन पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन विशेष कृती अभियानाचे अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफच्या बटालियन क्रमांक ३७ चे कमांडंट दाओ किंडो उपस्थित होते.

सी-६० पथकाचे एक हजार जवान, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे २१ जवान तसेच नवनियुक्त पोलिस व विशेष अभियान पथकाच्या पाचशे जवानांच्या सहकार्याने हे नवीने पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले. हे पोलिस मदत केंद्र फुलणार परिसराची सुरक्षा आणि स्थानिक नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मैलाचा दगड ठरेल, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यावेळी म्हणाले.

२८ ऑक्टोबर २०२५ पासून शासनाने फुलणार मदत केंद्रास मंजुरी दिली होती. २०२३ पासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेले हे आठवे पोलिस मदत केंद्र आहे. आतापर्यंत पेनगुंडा, नेलगुंडा व कवंडे या तीन ठिकाणी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे मदत केंद्र भामरागडपासून २० किलोमीटर आणि छत्तीसगड सीमेपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर आहे.

या पोलिस मदत केंद्रात वायफास सुविधा, १२ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, सुरक्षेसाठी मॅक वॉल, बीपी मोर्चा, ८ सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून, तेथे ३ अधिकारी, ५० अंमलदार, राज्य राखीव दलाचे ४ गट, संभाजीनगर सी कंपनीचे २ प्लाटून, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियन एफ कंपनीचा १ असिस्टंट कमांडंट व विशेष अभियान पथकाचे २०० जवाने तैनात करण्यात आले आहेत.

याप्रसंगी जनजागरण मेळावा घेण्यात आला. तेथे महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लँकेट, भाडी, मच्छरदाणी, युवकांना कपडे, शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT