गडचिरोली

Gadchiroli Fraud Case : नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानाच्या मुलाची २ कोटींनी फसवणूक, आरोपीस पुणे जिल्ह्यातून अटक

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : सुमारे १३ वर्षांपूर्वी नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या पोलिस अंमलदाराच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याची सुमारे २ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून एका ठगास अटक केली आहे. ज्ञानेश्वर शिवाजी वारे(३०) रा.वरोडी खुर्द,ता.भोर, जि.पुणे असे आरोपीचे नाव असून, ४ आरोपी फरार आहेत.

सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पूर्वी जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यात अनेक पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. २०१३ मध्ये एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा जंगलात झालेल्या चकमकीत अंमलदार गणपत नेहरु मडावी हे शहीद झाले होते.

राज्य सरकारच्या धोरणानुसार, शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी दिली जाते. त्या अनुषंगाने गणपत मडावी यांचा मुलगा सागर मडावी याने अनुकंपा तत्वावर वर्ग-१ पदासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता. अशातच २०२२ मध्ये सागर हा पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना त्याची ओळख ज्ञानेश्वर वारे याच्याशी झाली. त्याला सागर हा अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कळले. त्यानंतर ज्ञानेश्वर वारे याने आपली मंत्रालयात ओळख असून, तुला उपजिल्हाधिकारी वर्ग-१ पदासाठी मदत करेन. मात्र, त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सागरला सांगितले. पुढे ज्ञानेश्वर वारे याने सागर व त्याची आई मीना मडावी यांच्याकडून अन्य चार आरोपींच्या मदतीने वेळोवेळी रोख स्वरुपात, फोन पे वरुन आणि एटीएममधून २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपये उकळले.

एवढी मोठी रक्कम देऊनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सागर मडावी याने २० एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानेश्वर वारे याच्यासह अन्य चार आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गडचिरोलीचे पोलिस पथक पुणे जिल्ह्याकडे रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, गडचिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या नेतृत्वातील पथकाने ज्ञानेश्वर वारे यास पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतून अटक केली. न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

'ते' चार फरार आरोपी कोण?

शहीद जवानाच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावून देण्यासाठी मोठी रक्कम उकळणाऱ्या ज्ञानेश्वर वारे याने ज्या चार लोकांची नावे सांगितली; त्यात पोलिस दलातील अधिकाऱ्यांचा किंवा मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे काय, याविषयी कठोर तपास केल्यास मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो, अशी नागरिकांत चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT