Pudhari File Photo
गडचिरोली

गडचिरोली : ८३ हजारांची लाच स्वीकारणारे वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल एसीबीच्या जाळ्यात

Gadchiroli Crime News | माती उत्‍खनणावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : घरकुल बांधकामासाठी विटा तयार करण्याकरिता लागणारी माती खोदत असताना धाड घालून कुठलीही कारवाई न करण्याकरिता एका व्यक्तीकडून ८३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलापल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल व वनरक्षकास पंचांसमक्ष पकडून गुन्हा दाखल केला आहे. मारोती गायकवाड(वनपाल), ममता राठोड(वनपरिक्षेत्राधिकारी) व गणेश राठोड(वनरक्षक) अशी गुन्हा दाखल झालेल्या वनकर्मचाऱ्यांची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारास शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहे. ६ फेब्रुवारीला तो घरकुलासाठी विटा बनविण्याकरिता गावानजीकच्या नाल्यातून माती आणायला गेला. त्यासाठी त्याने नातेवाईकाचा ट्रॅक्टर आणि मजूरही नेले होते. एवढ्यात वनपाल मारोती गायकवाड तेथे पोहचला. त्याने वनविभागाच्या जागेतून मातीचे अवैध उत्खनन करीत असल्याचे सांगून तक्रारदारासह ट्रॅक्टर मालक व मजुरांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. मात्र, तक्रारदाराने गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली असता गायकवाड याने १ लाख १० हजार रुपये घेऊन दुसऱ्या दिवशी आलापल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात येण्यास सांगितले. सोबत वनपाल ट्रॅक्टर घेऊन गेला.

परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाचे अधिकाऱी लाचेची पडताळणी करण्याकरिता जात असताना वनरक्षक गणेश राठोड याने वरिष्ठांना भेटून प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता तक्रारदारास ३५ हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार हा वनपरिक्षेत्राधिकारी ममता राठोड यांच्या कक्षात वनपाल मारोती गायकवाड यास भेटला. तेथे सौम्य दंडात्मक कारवाई करण्यासाठी मारोती गायकवाड याने १ लाख १० हजारांची मागणी केली. परंतु एवढी मोठी रक्कम देण्यास तक्रारदारने असमर्थता दर्शविली. त्यावर वनपरिक्षेत्राधिकारी ममता राठोड हिने वनगुन्हा दाखल करुन तुरुंगवास होईल, अशी भीती दाखवून लाच मागण्यास प्रोत्साहन दिले. काही वेळाने तक्रारदार वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर आल्यावर वनपाल गायकवाड याने १ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ८ फेब्रुवारीला पुन्हा ममता राठोड हिने तक्रारदारास लाच देण्यास सांगितले. त्यानंतर वनपाल मारोती गायकवाड याने वनपरिक्षेत्राधिकारी ममता राठोड हिच्यासमक्ष १ लाख रुपये स्वीकारुन तक्रारदारास १७ हजार रुपयांच्या दंडाची पावती दिली. त्यामुळे एसीबीने तिघांवरही अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजाळकर, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT