गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना शनिवार १ मार्चच्या रात्री उघडकीस आली. संतोष भाऊजी राऊत(४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शनिवारी संतोष राऊत हे आपल्या शेतावर मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. परंतु संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले. शेतालगत संतोषचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पायाचा लचका तुटल्याचे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.