गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : शेतावर गेलेल्या शेतकऱ्यास वाघाने हल्ला करुन जखमी केले. आज (दि.१४) संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास देसाईगंजनजीकच्या जुनी वडसा या गावी ही घटना घडली. गणपत केशव नखाते (वय ४६) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे गणपत नखाते हे आज सकाळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील आपल्या शेतावर गेले होते. तेथे काम करीत असताना अचानक वाघाने पाठीमागून हल्ला केला. नखाते यांनी आरडाओरड करताच नदीवर स्नानासाठी जाणारे नागरिक धावून गेले. त्यानंतर वाघाने पळ काढला. नखाते यांच्या पाठीला जखम झाली आहे. त्यांना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी धोंडणे, क्षेत्रसहायक कऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नखाते यांची विचारपूस केली. वाघाने हल्ला केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.